Radhika Deshpande

cropped-img-20160302-wa00001.jpg

शूटिंगसाठी पुणे – मुंबई – पुणेचा सतत सुरू असलेला प्रवास. प्रवासात अंतर्मुख होणारी मी. मनात दडलेले विचार, विचारांमध्ये पडलेली मी. विचारांचा प्रवास. या प्रवासात कधी मी साता समुद्रा पार तर कधी मी मामाच्या गावात !

सापडतात मला समुद्रातले माणिक मोती. दिसतात मला त्या गावातल्या गमतीजमती. मी कुठे होते, ती जागा कशी, तिथली माणसं कशी हे सगळं लिहून ठेवावंसं वाटतं. म्हणूनच ही “ब्लॉग” नावाची खिंड (passage).

जिथे मी लिहू शकते मला हवं ते. संवाद साधू शकते स्वतःशी. या खिंडीतून प्रवास करताना शिरता येईल तुम्हाला,माझ्या मनात. वाचा आणि बघा येता येईल तुम्हाला मी असेन तिथे…

बॉयफ्रेंड. सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर 40. Uncut version इथे वाचा.

बॉयफ्रेंड. सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर 40. Uncut version इथे वाचा.

हाहा! शीर्षक ऐकल्यावर कान टवकारले असतील. वाचण्यासाठी लगेच तुम्ही तुमचा चष्मा चढवला असणार. नाही? बॉय फ्रेंड हा विषयच तसा नॉर्मल लोकांना कुतूहलाचा आहे त्यामुळे तुम्ही आता वाचायला घ्या.

तर सांगायचं हे आहे की मी त्या काळातली आहे ज्या काळात “बॉय फ्रेंड” हा असा कुठला शब्दच नव्हता. म्हणजे इंग्रजी भाषेत होता पण तो बोली भाषेत तेवढा प्रचलित नव्हता. आणि आता होतो इतका त्याचा बोलबाला तर नव्हताच. १९९० दशकातला एकतर बॉय फ्रेंडच नव्हते. म्हणजे ‘बॉईज’ म्हणजे ‘मुलं’ होती पण बॉय फ्रेंड असला काही प्रकार नव्हता. होती ती फक्त ‘लफडी’ नाही तर एकत्र जीवन मरणाच्या आणाभाका घेतलेले प्रेमी युगुल. त्या काळात मुलगी लग्न झाल्यावर माहेरचं आडनाव लावीत नसे. डायरेक्ट सासरचं नाव मधे नवऱ्याच्या नावा लगोलग. हा तो काळ आहे जेंव्हा जुने सगळे पाश सोडून मुलगी सासरी आली की तिच्या जगासकट जुनी नाती ही फिकी पडायची. मैत्रिणींची जागा नणदा भाऊजायांनी घेतली असायची आणि आयुष्यात बॉय कोणी असेल तर तो तिचा स्वतःचा नवरा. नवरी मुलीनं गाव सोडलं की बाकीची सगळी नाती वेशीवर टांगलेली. “आता तू तिकडच्यांची मर्जी राख. आमचं आम्ही पाहून घेऊ” हे मी माझं म्हणून सांगत नाही आहे. हे तेंव्हाचं नॉर्मल होतं.

पण आता तसं नाही आहे. मुलगी सासरी आली की तिचा आपल्या माहेरच्यांशी संवाद बऱ्यापैकी रोज बघायला मिळतो. तिचे मित्र मैत्रिणी तिच्याशी कनेक्टेड असतात. एवढंच नाही तर तिचं माहेरचं आडनाव सुद्धा तिच्या बरोबर असतं. हे सध्याचं नॉर्मल आहे. राहतो मुद्दा गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड चा. तर त्यांची ही एन्ट्री होते पण एक्स बॉय फ्रेंड, एक्स गर्ल फ्रेंड म्हणून.

बदल अजुन झालेला नाही आहे तो extra marital affair मधे. अनैतिक संबंधांना अजूनही मान्यता नाही. मुळात एका पुरुष आणि स्त्री मध्ये संबंध तेंव्हा अनैतिक होतात जेंव्हा आपल्या जोडीदाराला त्यांनी अंधारात ठेवलं असतं. त्याच्यापासून लपवलं आणि खोटं बोलावं लागलं तर. पण हे आजूबाजूला घडत असताना नाकारता कसं येणार!

माझ्याकडे मैत्रीण म्हणून जेंव्हा माझे मित्र मैत्रिणी सल्ले मागायला येतात तेंव्हा मात्र मी संभ्रमात पडते. नेमकं काय बरोबर आणि काय चूक. कोणाचं बरोबर आणि कोणाचं चूक. कुठलीच स्त्री किंवा पुरुष सर्वगुणसंपन्न नसतो. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. अगदी तीनही स्तरांवर म्हणजे मानसिक, शारीरिक, बौद्धिक, नवरा बायको पूरक असतात ह्यावर मला शंका आहे. मग ह्यापैकी कुठल्याही गरजांसाठी त्याने किंवा तिने मैत्री केली तर आपल्या भुवया अजूनही का उंचावतात? फसवेगिरी आणि खोटं बोलण्याची वेळच का येते? विचार करायला हवा नाही?
लग्न झाल्यावर मला तो माणूस मित्र म्हणून आवडतो असं सांगायलाही अनेक बायका अजूनही का घाबरतात? “मी तुला कॉफी प्यायला भेटलो हे सांगू नकोस हं माझ्या बायकोला” असं पुरुष मंडळी का सांगतात? इथूनच खरी गडबड व्हायला सुरुवात होते.

मी कॉलेज मध्ये असताना आमच्या घरी आईनी घातलेला नियम होता. मी कुठे जाते आहे, कोणाबरोबर आहे आणि घरी किती वाजता येणार आहे हे आईला सांगायचं. मग मी त्या व्यक्ती बरोबर काय केलं आणि किती आणि कुठल्या गप्पा मारल्या हे तिने मला खोदून कधीच विचारलं नाही. हीच सवय मला आजही आहे. पण आता आईच्या ऐवजी मी नवऱ्याला सांगते. मग त्याचंही काही म्हणणं नसतं. शेवटी नातं विश्वासावर चालतं. नात्यांमध्ये निखळ, अवखळ, कुठलेही पाश नसलेलं, निव्वळ सहवासाची अपेक्षा असलेलं नातं हे मैत्रीचं. मग ते लग्ना आधी ही आणि लग्ना नंतर ही बघणार्‍यांना अमान्य का असावं? नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे, त्यांनी त्यांची लक्ष्मण रेषा ओलांडली आहे हे आपण सांगणारे कोण? मुळात नात्यात लक्ष्मण रेषाच नको, लक्ष्मण रेषा होती आणि ती ओलांडली म्हणून रामायण घडलं असंही मानणारे लोक आहेत. किंवा सगळेच नवरा बायको, प्रेमी प्रेयसी अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा कसे असू शकतील? निदान ह्यावर आम्ही विचारच करणार नाही असं तरी म्हणू नका.

माझ्या मते आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला मित्र – मैत्रीण हे नातं असावं. त्याला अगदी बॉय फ्रेंड, गर्ल फ्रेंड म्हणायची काय गरज! काही नाती तुम्हाला टवटवीत ठेवतात, इच्छांना नवी पालवी फुटते, नातं बहरलं की त्याचा वृक्ष तयार होतो, तो अनेक नात्यांना जपतो आणि त्याचे फळ म्हणजे, आनंद! हे माझं मत. काहींना बोल्ड तर काहींना पटलं नसेलही, काही मनोमनी अगदी शंभर टक्के बरोबर आहे असं म्हणतील. असो.

मी ह्या विषयावर माझ्या नवऱ्याशी आणि तेरा वर्षाच्या मुलीशी चर्चा केली. तिला विचारलं “बॉय फ्रेंड” बद्दल तुझं काय मत आहे? तर तिने फाड फाड इंग्रजीत मला उत्तर दिलं. “बॉय फ्रेंड्स आर ओव्हर रेटेड अँड अ वेस्ट ऑफ टाईम.” आश्चर्याने आमचे डोळे बाहेर आणि तोंडाचा ‘ऑ’ झाला. आमचे चेहरे पाहून म्हणते कशी. “आई येवढं रिअॅक्ट व्हायची गरज नाही. This is the new normal.”

त्यामुळे “बॉय फ्रेंड” ह्या विषयाला आणि लेखाला इथे पूर्णत्व मिळत नाही तर इथून तो खरा सुरू झाला आहे. माझा नवरा म्हणाला, शेवटी तू लेखात तुला बॉय फ्रेंड आहे का नाही हे वाचकांना सांगितलंच नाही. त्याच्या मते एखाद्या शास्त्रीय गायकानी षड्जावर येतो आहे म्हणता म्हणता पलटी घेऊन दुसऱ्या सुराकडे वळावं तसं केलं मी. सोप्प्या शब्दात सांगू का? एखाद्या बातम्यांच्या चॅनल वर ब्रेकिंग न्यूज म्हणून काहीतरी सांगायचं आणि ब्रेक नंतर बातमी ऐकावी तर बातमीत ब्रेकिंग काहीच नाही, सगळं शब्दबंबाळ, हाती गवसणार शून्य. काय म्हणता, मुद्याचं बोलू? बरं सांगते, ह्या लेखाला शब्दांची मर्यादा असल्यामुळे आणि काही कारणास्तव मला हा लेख इथेच थांबवावा लागतो आहे. पुन्हा भेटूच. वाचत रहा माझ्यातल्या लेखकाला सकाळच्या या राखीव जागेत फक्त शनिवार ते शनिवार. नमस्कार!

~रानी

‘बड़ा है दर्द का रिश्ता।’

‘बड़ा है दर्द का रिश्ता।’
सोचती हूं इस लाईन पर चार पंक्तियां लिख डालूं।
दर्द को अपनी कलम से कागज़ पर कविता के रूप में प्रस्तुत कर ही डालूं।
क्या कहती हो?
अगर दर्द को समझकर, अपना मानकर महसूस कर सको और उसे नमक मिर्च लगाए हुए एक मीठे अमरूद की तरह पेश कर सको तो जान लो तुम एक बड़ी अदाकारा हो।
फिलहाल सोचती हूं इस बड़े दर्द के रिश्ते को चार छोटी पंक्तियों में बांध ही डालूं। कागज़ की नाव बनाकर नदी में बहता देख अलविदा कर जाऊं।
क्या कहती हो?

‘मीम’पणाची नको बाधा!

‘मीम’पणाची नको बाधा!

सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३९. Uncut version इथे वाचा.

मीम्स म्हणजे एखादा फोटो, चित्र घेऊन त्यावर टिका, टिप्पणी, व्यंगात्मक लेखन करण्यात येतं ज्यातून जनसामान्यांना ते समजावं, आवडावं, त्यातून विनोद निर्माण व्हावा आणि लोकांचं मनोरंजन व्हावं.

काही दिवसांपूर्वी आमच्या दोघींचा फोटो घेऊन एक मीम तयार करण्यात आलं, ज्यामध्ये तुम्हाला देविका आणि अरुंधती दिसताहेत. ‘आई कुठे काय करते’ ह्या स्टार प्रवाह वर गाजत असलेल्या मालिकेत मी देविका ची भूमिका करते, जी अरुंधती ची खास मैत्रीण दाखवली आहे. ह्या मैत्रिणींची जोडी ‘शोले’ चित्रपटातल्या जय – वीरू सारखी गाजते आहे. त्यामुळे देविका कुठे काय करते हे जाणून घेण्यासाठी अनेक सोशल नेटवर्किंग साईट्स वर माझी माहिती नेट वरूनच गोळा करून त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला ज्याला एक लाखाहून अधिक प्रेक्षकांनी बघितल्याची बातमी माझ्या पर्यंत पोहोचली. काहींनी माझे portraits करून पाठवले, काही ठिकाणी माझ्या नकळत बऱ्यापैकी मेळ खाणारी माझी खाजगी माहिती, मला न विचारता लेखन स्वरूपात पोस्ट केली. पण सर्वात गम्मत मला मीम्स ची वाटली. माझ्या बरोबर अरुंधतीचं काम करणाऱ्या माझ्या सहकलाकार आणि मैत्रीण मधुराणी गोखले प्रभुलकर हिच्या सोबत मी #कपलचॅलेंज बद्दल बोलते आहे असा उल्लेख होता. ह्या मीम ला भरपूर लाईक्स आणि शेयर मिळाले.

अचानक मिळालेली लोकप्रियता, प्रसिद्धी हवीहवीशी वाटणं सहाजिक आहे पण त्याच बरोबर लोकांचे आपल्याकडे लक्ष आहे, ते आपल्याला फॉलो करताहेत आणि आपण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या दृष्टीक्षेपातून जाते आहे. आपण सतत कोणाच्यातरी नजरेत आहोत. आपल्यावर काही जण पाळत ठेवून आहेत हेही ध्यानात येतं आहे. आज लेख, चित्र, व्हिडिओ, मीम्स मध्ये आपण आहोत. उद्या व्यंगचित्र आणि बातमीत यायला कितीसा वेळ लागेल ह्याचा अंदाज काय तो बांधता येईल. इथून पुढे आपण जे वागतो, बोलतो, दिसतो आणि लिहितो ते सुद्धा प्रेक्षक, समीक्षक आणि टीकाकार बघणार. त्यावर ते चर्चा करून, थोडा मीठ मसाला लावून बातमी करून आणि ठोकताळे लावून निष्कर्ष ही लावू शकतात ह्याची मला कल्पना आहे. सगळ्यांची गम्मत वाटते आहे खरी पण दुसऱ्या क्षणी जबरदस्त जबाबदारी ही वाटते आहे हो!

म्हणजे नेमकं माझ्यातल्या कलाकाराला कसं वाटतं आहे दोन शब्दांमध्ये सांगू? ‘शुभमंगल’ आणि ‘सावधान’! प्रसिद्धीची हवा माझ्या कडे येते आहे म्हंटल्यावर शुभमंगल होणारच. पण सावधान ह्यासाठी कारण माझी परिस्थिती म्हणजे अगदी त्या बोहोल्यावर उभ्या असलेल्या नवंवधू सारखी आहे. सगळ्यांचं लक्ष तिच्याच कडे. काही जण वधू पाटावरून घसरते का हे पाहण्यासाठी उत्सुक तर बरेच जण ती समोर उभ्या असलेल्या वराच्या गळ्यात हार कसा घालते तो क्षण बारीक लक्ष देऊन एकाग्रतेने पाहणार.

एकदा का मालिकेतली भूमिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचून त्यांच्या मनात घर करायला लागली की अपेक्षा वाढतात. आम्ही त्यांच्या घरातले सदस्य होतो आणि अमाप अफाट प्रेम मिळतं पण जरा पाऊल वाकडं पडलं तर प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागतो आणि परिस्थितीला तोंड ही द्यावं लागतं.

अशी परिस्थिती माझ्यावर उलटली तर? आपण ट्रोल झालो तर? नापसंत ठरलो तर? अशी मला भीती नाही पण ही अचानक मिळालेली प्रसिद्धी अचानक गायब झाली तर? अशी जेंव्हा मनात पाल चुकचकते तेंव्हा मी स्वतःला समजावते. ‘प्रसिद्धी’ ही बर्फाच्या शिखरावर लिहिलेली अक्षरं आहे. आणि कधीतरी त्या अक्षरांवर सूर्याची तिरीप पडली तर ती विरघळणार हे ध्यानात असू दे. तू कोण आहेस? तू तो शिखर आहेस जिच्यावरचा बर्फ गळून गेला तरी ते शिखर जागच्याजागी उभे राहते. पर्यटनासाठी आलेले पर्यटक चार दिवस येतील. त्याचं मनोरंजन तू कर. तू त्या पर्वत श्रृंखलेचा भाग आहेस ज्यावर विस्मयकारी नटराजाची कृपादृष्टी आहे.

कलाकारांनी आपलं काम करावं. आज मीम्स आले म्हणून फार हुरळून जाऊ नये. किंवा उद्या व्यंगचित्र काढले म्हणून राग किंवा वाईटही मानू नये. शेवटी कलाकार हा रसिक प्रेक्षकांसाठी असतो.

खरंतर देविका वर लिहिणारे, बोलणारे, मीम्स बनवणारे सुद्धा कलाकारच. त्यांनी सुद्धा वेळ काढून, कल्पनाशक्तीला ताण देऊन आणि मेहेनत घेऊन कलात्मकरित्या लोकांपर्यंत मीम्स पोहोचवली. मी सुद्धा शोधून काढले मीम्स बनवणारे हे कलाकार आहेत तरी कोण. रेशमा शिंदे हिने तिच्या कल्पनेतून ही मीम साकारली आहे. तिचा उल्लेख मुद्दाम करते आहे, कारण तिलाही प्रसिद्धी मिळायला हवी. ही पब्लिसिटी पूर्णपणे ऑरगॅनिक आहे आणि ह्याचा चॅनलच्या मार्केटिंगशी काही संबंध नाही.

देविका असो वा राधिका, इथे प्रत्येकजण आपली भूमिका निभावत आहे. त्याला उचलून धरायचं का मोडून काढायचं हे काय ते आमच्या माय बाप प्रेक्षकांवर अवलंबून आहे. एका कलाकाराच्या आयुष्यात हेच काय ते शाश्वत आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या.

एक ‘ निरोप ‘ पत्र. वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३८. Uncut version इथे वाचा.

एक ‘निरोप’पत्र

सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३८. Uncut version इथे वाचा.

२०२०, मी तुला हे पत्र लिहिते आहे. मी ठरवलं होतं तू आल्यापासून तुला काही बोलायचं नाही. सगळं निमूटपणे सोसायचं. पदरी पडलेलं सगळं भोगायचं. झालेला त्रास, होणारी अस्वस्थता, वाढत चाललेली बेचैनी, उदासीनता, सगळं सगळं मुक गिळून सहन करायचं. सकारात्मक ऊर्जा वाढवायची, आहे त्यात सुख मानायचं, फार मोठी स्वप्नं बघायची नाही, एक एक करत दिवस पुढे ढकलायचा. एका सोशिक, सुज्ञ, कष्टाळू, कर्तृत्ववान, होतकरू, गृहदक्ष स्त्री प्रमाणे सगळं सहन करायचं.

ऑक्टोबर उजाडला आहे आणि आता नऊ महिने झाले तुझा भार आम्ही वाहतो आहे. तुला सहन करतो आहे. तू सांगितल्या प्रमाणे वागतो आहे. मुक गिळून मास्क चढवायला सांगितलेस आम्ही ते चढवले, शंभर वेळा हात धुवायला लावलेस, धुतले. बाहेर गेलात तर खबरदार म्हणालास, आम्ही गेलो नाही. २०२० तू आल्यापासून चांगलं काही घडलंच नाही असं नाही. वाईट काळात माणूस जास्त शिकतो. तू वाईट आहेस असं मी म्हणत नाही, पण वाईट काळ सांगून येत नाही तसा तूही आलास. आम्ही अजूनही तुला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तू वाईट का चांगला हे अद्याप आम्ही ठरवणार नाही कारण तुझे अजून तीन महिने बाकी आहेत. आणि मग तू जाशीलच. तू येताना पिशवी घेऊन आला होतास ती भरायला घेते आणि आशा करते तू ती घेऊन जाशील. निघताना तुला उशीर नको व्हायला आणि काही राहून गेलं असं तुझं नको व्हायला म्हणून.

सांग काय भरू तुझ्या पिशवीत?

बऱ्याच जणांचे पगार कमी झाले, अनेक जण उपाशी पोटी गेले, काही बेघर झाले तर काहींना घरच्या वस्तू विकाव्या लागल्या. काहींनी देवाघरी जावे लागले तर काही लोकांना देशोधडीला लावलंस. तू काळ बनून आला आणि सगळ्यांवर ठरवून राज्य केलंस. राजाला रंक केलंस पण रंक राजा बनल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही.

कोरोना घरा घरात ठाण मांडून बसला आहे. काही ठराविक लोकांनी जंगलात एका ठिणगी पासून वणवा पेटावा तसा कोरोना पसरवायचा प्रयत्न केला. अशा संकटात असताना सीमा विस्ताराची स्वप्न पाहणाऱ्या शेजारच्या कर्मदरिद्री लोकांनी सीमेवर उपद्व्याप केले, अशा वृत्तींना घेऊन जातोस का?

शाळा आणि देवळांना लागलेली कुलपं आहेत ती आधी घेऊन जा.

सिनेमा हॉल, नाट्य गृह, क्रिकेट स्टेडियमच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. त्यांचं रिकामपण घेऊन जा. सुशांत सिंहच्या मृत्यूचे ठोकताळे लावणारे काही मिडिया वाले त्याची गरमागरम ताजी बातमी करून आपापल्या पोळ्या त्यावर भाजतात. अशा चर्चा ही घेऊन जा.

पालघर मध्ये ऋषीमुनींना मारण्यात आलं कारण आपली सद सद विवेक बुद्धी इतकी ठिसूळ झाली आहे की माणूस हातावर हात ठेवून बसला आहे. अश्या निकामी बुद्धीला घेऊन जा.

कुठे महापूर आला तर कुठे जंगलाला आग लागून निष्पाप जनावरं गेली. असा थयथयाट आम्हाला नको आहे. ही अस्थिरता आणि अशांतता पिशवीत भरून देते आहे.

आणि हो, पिशवी मोठी देते बाबा रे पण न विसरता कोरोना ला आठवणीनी घेऊन जा.
काय म्हणतेय मी?
लक्ष आहे का तुझं?
गप्प झालास एकदम?

तू काही चांगलं केलंसंच नाही असं मला नाही म्हणायचं, उदाहरणतः आम्हा माणसांना आरसा दाखवलास. आम्ही घरी आणि घरच्यांना वेळ द्यायला शिकलो, काही वाईट apps बंद झाले, चीनच्या वाईट दृष्टीला डोळे दाखवायला शिकलो, रस्त्यावरचे अपघात कमी झाले, लाखो मदतीचे हात पुढे आले. माणसातला देव दिसायला लागला. ऑनलाईन लग्न झाली, हळुवार पावलांनी का होईना गणपती बाप्पा ही आला बरं का दारी. शिक्षण पद्धतीत सुधारणा झाली. बळीराजाला मानाने जगता यावं याकरिता पावलं उचलली जात आहेत. आम्ही २०२१ च्या तयारीला लागलो आहोत. तेंव्हा तू आता जा. म्हणजे अजून काही राहिलं नाही ना रे बाबा तुझं काही?

हे बघ अजून तीन महिने आहेत तुझ्याकडे. तुझ्या लेखी जे चांगलं आहे तेच तू देशील. वाईट बनायला कोणाला रे आवडतं, सांग बरं! येणाऱ्या काळात आम्ही तुला मास्टर म्हणू. कारण तू तुझ्या पद्धतीनी आम्हाला चांगलाच धडा शिकवलास, कारण एक गोष्ट खरी आहे, आमच्या पापाचा घडा भरला होता खरा. आता आलाच आहेस तर शेवटचे तीन महिने गुण्या गोविंदाने रहा. जाताना मी तुला निरोप द्यायला असेन पण तेवढी ती तुझी मी भरून दिलेली पिशवी मात्र आठवणीनी घेऊन जा. नेशील ना?

~ रानी

माझे मनो’गीत’ सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३७. Uncut version इथे वाचा.

माझे मनो’गीत’

सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३७. Uncut version इथे वाचा.

एक गाणं गुणगुणते आहे काही दिवस झाले. अक्षरं आहेत काही जुळून आलेली.
तारा री तारा रू

एक म्हणणं आहे बऱ्याच दिवसांपासून. छोट्याश्या जीवाला आपलीशी वाटणारी धुन आहे.
तारा री तारा रू

मनात उसळणाऱ्या लाटांना शांत करणारी लय आहे एक. सुवर्ण क्षणांची वाट आहे जणू
तारा री तारा रू

झुल्यावर बसून झुळझुळ वाऱ्याची झुळूक जणू. नदीच्या पल्याड असलेल्या एका बकुळीच्या झाडावरच्या एका फुलाचा गंध आहे जणू
तारा री तारा रू

आकाशातल्या ताऱ्यांना खाटेवर निजून मोजणे जणू. चांदीच्या वाटीत केशरयुक्त खीर आहे एक.
तारा री तारा रू

दुडू दुडू धावणाऱ्या बाळाच्या मुखातून खळखळणारे शब्द जणू. शब्दांच्या पेटीतून फुलपाखरा सारखी उडालेली ही अक्षरं आहेत काही
तारा री तारा रू

ता… रा… री.. तारा… रू
रू तारा… री… ता… रा…
तारा री …. ता…. रा… ता… रू!

सध्या मुंबई पुणे मुंबईचा सातत्याने प्रवास होतो आहे. अनेकदा प्रवास एकट्यात होतो. कार चालवत असताना स्वतःचे मनोरंजन करायचे झाले की मी पुस्तकं ऐकते, Podcast ऐकते आणि माझी आवडणारी गाणी ऐकते. कधी नवीन, जुनी, इंग्रजी, हिंदी आणि मराठीतली, एका नंतर एक. त्यामुळे सगळे इंद्रिय कामात असतात. कानांवर सतत काहीतरी पडत असतं, ऐकू येत असतं. आणि मग विचारांची एक शृंखला तयार होते. विचारांची मांडणीही तयार होते. तोंडी गणित सोडवल्या सारखं असतं सगळं. म्हणजे स्वतःला प्रश्न पडतात आणि पडलेल्या प्रश्नांची मांडणी करून त्यातून निष्कर्ष काढल्या सारखं. किंवा मग भूलभुलैया चा खेळ एकटीनेच खेळायचा आणि त्यातून स्वतःच बाहेर पडायचं. कधी कधी एक एकाकी कोळ्याचं जाळं मी विणावं आणि त्यात अडकतील ते प्रश्न सुटणार नाहीत म्हणून ते तसेच अडकवून ठेवावे. त्यावर पाणी पडण्याची वाट बघावी. हा मुंबई पुणेचा द्रुतगती मार्ग रुंद, स्वच्छ, वळणांचा आणि हवाहवासा आहे. कारच्या आतमध्ये विचारांची घुसळण होत असते पण कारच्या बाहेर बघायला मिळालं तर तुम्हाला दिसते हिरव्या हिरव्या रंगांची झाडी घनदाट, गोल गोल वळणांची झोकदार वाट आणि मग तुमचं स्वतःच एक गाणं तयार होतं. असंच एक अघळ पघळ गाणं… नाही… कविता… नाही… भावना… भिरभिरणारे विचार? झिरमिरणाऱ्या पावसासारखा शब्दांचा सडा? का कारच्या काचेवर आपटणाऱ्या शब्दांना वाईपर ने भिरकावून लावलेले काही तुषार जणू. का मोकाट सुटलेल्या वाक्यांना कारच्या वाढत्या गतीने मिळालेली वाट. शब्दांचे खेळ नुसते. बेधुंद होऊन शब्दात उतरणारे विचार थोडके. मोडक्या शब्दांना प्राजक्ताच्या फुलासारखं उचलून स्वतःवर केलेला सुगंधी वर्षाव जरासा. प्रवास मला आवडतो. स्वःचा स्वतःशीच केलेला संवाद असतो तो. सगळीकडे, सगळ्या ठिकाणी हजारो लोक पण तरीही एकटेपणा शिवतोच नाही आपल्याला? पण इथे तसं नसतं. इथे तसं नाही. इथे संवाद आहे माझ्याशी केलेला. इथे काही स्वप्नांनी घेतलाय आकार, काही अस्फुट शब्दांना फुटलाय पाझर, काही इच्छांचा बहरलाय वेल. हे गाणं मी गुणगुणते आहे सारखं…

तुम्हाला कधी सुचलं आहे का हो एखादं गाणं? गाणं, कविता, लेख सुचले नाही तरी चालेल पण तुम्ही केला आहत का स्वतःशी संवाद? नसेल केला तर जरूर करा. आपल्या आतला आवाज ऐकण्याचा प्रवास करा. मग हवं तर डोंगर चढून जा, नद्या ओलांडताना करा, दऱ्याखोऱ्यातून वाट काढताना करा. हवं तर तुम्ही सुद्धा मुंबई पुणे चा प्रवास करा. आणि तारा री तारा रू सारखं गाणं तुम्हालाही सापडतं आहे का सांगा. पण आपल्या आतलं गाणं ऐकण्याचा प्रयत्न करा.

~रानी (राधिका देशपांडे)

प्रवास ‘ब्लॉग’ ते ‘ब्लॉक’ पर्यंतचा. सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. नक्की वाचाआर्टिकल नंबर ३६. Uncut version इथे वाचा

प्रवास ‘ब्लॉग’ ते ‘ब्लॉक’ पर्यंतचा. सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३६. Uncut version इथे वाचा.

३६ हा निव्वळ एक आकडा आहे. माझा कोणाशीही ३६ चा आकडा नाही आहे. आणि लेखानाशी तर नाहीच नाही. पण आज का कोण जाणे, मला काहीच सुचत नाही आहे. शब्द सापडत नाही आहेत, वाक्यरचना होत नाही आहे आणि दोन वाक्यांना सांधणारा दुवा सापडत नाही आहे, आणि वाक्यांनी बनलेल्या परिच्छेदाला अर्थ लागत नाही आहे. नाही… खरंतर परिच्छेद बनेल एवढी वाक्य उमटत नाही आहेत. सकाळच्या “मैत्रीण” या सदरासाठी हा माझा ३६ वा लेख आहे आणि माझ्याकडे लिहिण्या जोगतं काही नाही आहे. म्हणजे पूर्वीच्या चित्रपटात प्रियकर आपल्या प्रेयसीला पत्र लिहायला घ्यायचा आणि सुरुवात कुठून करू, काय लिहू, किती लिहू, कसं लिहू या विचारत पडलेला दिसायचा आणि मग कट टू त्याने फाडून फेकलेल्या कागदांच्या बोळ्यांचा शॉट असायचा. तसं माझं झालं आहे असंही म्हणता येणार नाही, कारण मी काही प्रियकर नाही आहे. मला काही प्रेम रोग जडला नाही आहे. तरी पण मला काही केल्या सुचत नाही आहे. अचानक असं का होतंय? डोक्याचा भुगा झाला आहे. लेख प्रूफ रीडिंग साठी पाठवण्याची डेडलाईन जवळ आली आहे आणि मूड सेट होत नाही आहे.

चिडचिड, अस्वस्थता, बेचैनी आणि मग उदासीनता येण्याच्या मार्गावर मी असताना माझ्या एका लेखक मित्राचा फोन आला. मी त्याला पटकन सांगितलं, मला भयंकर असं काहीतरी झालं आहे. माझ्यातली कल्पनाशक्ती कमी झाली आहे. विचारांना चालना मिळत नाही आहे. विचारांचं बीज सापडत नाही आहे. सापडलं तरी त्याला अंकुर फुटत नाही आहेत. अंकुर जरी फुटले तरी त्यांचा सुंदर वृक्ष होईल अशी शाश्वती वाटत नाही आहे. मला काय होतंय ते मलाच समजत नाही आहे. कुठल्या डॉक्टर ला दाखवण्या इतपत ही काही गंभीर वाटत नाही आहे. पण असं जर मला सुचलंच नाही तर काय होईल? कागद आणि लेखणी माझ्यावर रुसून तर बसले नाही ना? माझ्या आयुष्यात कुठला तरी ताण आहे का ज्याच्या मुळे असं होतं आहे? का कोणाची नजर लागली आहे? का मी “आपल्याला जमणार नाही” असं कुठेतरी ठरवून टाकलं आहे? का विद्येची देवता माझ्यावर नाराज आहे म्हणून असं होतंय? का मी खूप जास्त विचार करते आहे? मित्रा, मला काय झालं आहे? असा शेवटचा प्रश्न त्याला विचारून मी थांबले. हे बघ, मी काही डॉक्टर नाही पण मी एक लेखक आहे आणि मी तुला एवढं नक्की सांगू शकतो की तुला भयंकर असं काही झालं नाही आहे. तुला ‘ब्लॉक’ आला आहे, ‘रायटर्स ब्लॉक’. मी म्हणाले “‘रायटर्स ब्लॉग’ मला माहित होता पण ह्या ब्लॉक बद्दल नवलच वाटलं. ब्लॉक म्हणजे?”

त्याने सांगितलं, “म्हणजे लेखकाचं लिखाण थांबतं. त्याला काहीच सुचत नाही. क्षीण, ताण, तणाव, वातावरण अशी कुठलीही कारणं नसतात. बस, लिखाण थांबतं. विषय कठीण आहे, कंटाळा आला आहे, लेखाची बांधणी कठीण आणि खूप मोठी आहे अशीही कारणं नसतात. बस, सुचत नाही. लिखाण काही काळ थांबतं.” “मग अश्या वेळी आपण काय करायचं? मी काय करू?” तो हसून म्हणाला, “काही करायचं नाही. काही काळ जाऊ द्यायचा. कुठेही उवाच्च करायचं नाही. त्याचं भांडवल करायचं नाही. शांत राहायचं. विचारांच्या वाहत्या झऱ्याला मिठाचे खडे लागावे आणि प्रवाह अडकून पडावा तसं. एकदा का ते विरघळले की प्रवाह सुरू होतो आणि परत विचारांना ओघवती धार लागते.” मी म्हणाले, “कमाल आहे. हे फक्त माझ्यासारख्या नवख्या लेखका बरोबर होतं आहे की तुझ्या ही बरोबर झालं आहे?” तो म्हणाला, “अगं मोठे मोठे लेखक ही त्यातून सुटले नाही. असं होतं. याला काही इलाज नाही बघ.”

मी ब्लॉग लिहायला घेतला ते मला व्यक्त होण्यासाठी, पुढे लिहायला लागले कारण मला वाचक मिळाले. लिहीत राहायचं ठरवलं कारण मी नुसतंच व्यक्त न होता वाचकांना देता येत होतं. इथेही मला अभिप्रेत असलेल्या प्रेक्षक वर्गाचं मी मनोरंजन करू शकते आहे ह्याचा आनंद आहे म्हणून मी लिहिते.

आजही मला कोणी “ह्या लिहितात ही” असं म्हंटल की कसंनुसंच होतं. कारण लेखणी धरली, लेखणी उचलली आणि लिखाण केलं ह्या मध्ये बराच प्रवास घडतो. ह्या प्रवासाची मी नवीन प्रवासी आहे. हा प्रवास एकट्याने करायचा असतो पण ह्यात अनेक वास्तू, वस्तू, असतात आणि तरल, तरतरीत काही तृप्त करणाऱ्या भावना असतात. हा प्रवास मला हवा हवासा वाटतो. म्हणून मी लिहिते. प्रत्येक लेखकाची विषय मांडण्याची पद्धत वेगळी असते. त्यांचा त्यांचा फॉर्म्युला असतो. बोळणाऱ्याचा लहजा, वाद्यांचा बाज आणि सुगरणीचा स्वयंपाकाचा अंदाज वेगवेगळा असतो तसंच लेखकाच्या लेखणी ला असलेली धार आणि रस, रंग त्याच्यावर अवलंबून असतो.

मला विचाराल तर मी किराण्याची यादी तयार केल्याप्रमाणे मुद्द्यांची यादी तयार करते आणि माझ्या मुलीला वाचून दाखवते. मग ती मला सांगते. चल आता लिहून काढ पटापटा. माझं तिला म्हणणं असतं. पटापटा लिहून काढायला तो काय कॉर्पोरेशन चा नळ आहे? फिरवला की भराभर पाणी यायला? एका गरोदर स्त्री प्रमाणे माझी अवस्था होते. प्रसूतीचा काळ यातनांनी भरलेला असतो. पण एकदा का लेख बाळ म्हणून जन्माला आला की ब्रम्हानंदी आनंद असतो. अगदी हुश्श व्हायला होतं कधीकधी तर. भिजत घातलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांमधे हळू हळू साखर घालत विचारांना मुरू देत त्यांचा गुलकंद झाल्यावरच तो तुमच्या पर्यंत पोहोचवावा. काय म्हणता?

अय्या बघा! तुमच्याशी बोलता बोलता लेख तयार झाला. आता सकाळच्या कोऱ्या करकरीत पानांवर जेंव्हा ही अक्षरं, मुळाक्षरं, वाक्य, पॅराग्राफ आणि नकळत तुमच्याशी संवाद छापील स्वरूपात सादर होईल तेंव्हा त्याची उंची, दर्जा, पोत आणि झालेला परिणाम ह्या लेखाला पूर्णत्व देईल. लेखन करण्यासाठी तुमच्याकडे असायला लागते खाण. खोल खणात सापडतात तुम्हाला हिरे तर कधी लागतो खळखळणारा झरा. कधी कधी लागलाच नाही हाती तर समजावं आज ब्लॉक हाती लागला आहे. लेखणीला थोडा स्वल्प द्यायचा आणि सांगायचं स्वतःला. वाह! इतर लेखकांप्रमाणे आज मला ब्लॉक गवसला! आणि

ह्याच ब्लॉक ने माझा ब्लॉग ही घडवून आणला. काय म्हणता? सुचत असल्यास लिहून पाठवा. नसेलच सुचत तर तुम्हाला हा ब्लॉक आहे का, हे चाचपडून पाहण्यासाठी तरी लेखणी उचला.

~ रानी

आमचे कला – कार

आमचे कला – कार. सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३५. Uncut version इथे वाचा.

काही आठवड्यांपूर्वी ‘ सवत माझी लाडकी ” नावानी मी माझ्या “लाडो” बद्दल लेख लिहिला होता. म्हणजेच माझ्या कार बद्दल. सवत असली तरी ती माझी कशी लाडकी आहे असं तुम्हाला सांगितलं होतं. आणि म्हणूनच अधून मधून मी तिला ब्युटी पार्लर मध्ये ट्रीटमेंट साठी नेते. कार वर प्रेम करणारे तिला शाम्पू वॉश साठी कार केअरच्या दुकानात नेतात. ते त्याला ‘स्पा’ ट्रीटमेंट म्हणतात. यंदा लाडो ला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली. खास लोकांकडून. तिच्या हक्काच्या पार्किंग मध्येच तिचं ‘vacuum cleaning, shampoo वॉश, dashboard पॉलिश आणि external wax पॉलिश, म्हणजे सोप्प्या भाषेत सांगायचं तर. Manicure, pedicure, head massage आणि वॅक्सिंग झालं. लॉक डाऊन नंतर नवऱ्यामुली सारखी नटून शेफरली आहे, पण मी दोन कारणांसाठी खुश आहे. एकतर माझ्या सखीला clean and shine च्या टीम नी घरी येऊन personalised ट्रीटमेंट दिली आणि ट्रीटमेंट देणारे दुसरे तिसरे नव्हते तर पुण्याचे रंगकर्मी होते.

कोरोनाच्या काळात त्यांनी हा पर्यायी व्यवसाय म्हणून निवडला आहे आणि असं करणारे हे पुण्याचे पडद्यामागील कलाकार आहेत जे लॉक डाऊन च्या आधी नाटकाचे बॅकस्टेज सांभाळत. हे ते कलाकार आहेत ज्यांच्या भरवश्यावर नाटक उभं राहतं, ज्यांच्या मुळे आम्ही पडद्या समोरील कलाकार निर्धास्त पणे रंगभूमीवर वावरू शकतो.

संकट समयी माणूस माणसाचा कामाला येतो. कोरोना मुळे कोणाचीच वाट गुलाबाच्या पाकळ्यांनी मढलेली नाही. आयुष्याचे धडे गिरवत असताना कोणाची वाट खाच खळग्यांनी तर कोणाची अरुंद, काटेरी झाली. आपण सगळेच अजूनही सावरतो आहोत झालेल्या मानसिक, आर्थिक उलथापालथीतून. आमचे कलाकार मित्र ह्यातून सुटले नाहीत. मनोरंजन हे प्राथमिक गरजांमध्ये मोडत नसल्याने अनेकांच्या नोकऱ्या धंदे गेले आणि काळजी आणि चिंता ह्यांनी प्रत्येकाच्या मनात घर करायला घेतलं. अश्या परिस्थितीत आम्ही कलाकार मंडळींनी मित्र कलाकारांची मदत करायचं ठरवलं आणि जमेल तशी मदत केली ही. पण हा काळ २ – ३ महिने मर्यादित नाही. तो अजूनही म्हणावा तसा संपलेला नाही. म्हणून प्रत्येकानी पर्यायी विकल्प शोधायला सुरुवात केली आहे. अशा वेळी राहुल जोशी ह्यांना सुचलेली कार वॉश ची कल्पना गणेश माळवदकर, यशोदीप खरे, पुष्कर देवगावकर ह्यांनी उचलून धरली.

मी त्यांचं काम थांबून बघितलं. मला त्यांचं कौतुक वाटलं. ते लाडोला एक रंगमंच तयार करतात तसं तयार करत होते. गणेश जो एरवी रंगमंच व्यवस्था बघतो त्याने vacuum cleaner हातात घेतला, यशोदीप जो lights करतो त्याने सफाई कुठून करायची, कुठे किती वेळ लागेल आणि त्याला काय काय लागणार आहे हे राहुल ला सांगितलं आणि dashboard polish करायला घेतला. लाईट करतो त्या प्रमाणे आहे असं यशोदीप म्हणाला. कुठे किती कसा आणि कुठल्या रंगाचा लाईट पाडायचा आहे त्या प्रमाणे मी पॉलिशिंग करायला घेतो. पुष्कर जो एरवी आमचा मेकअप करतो, तितक्याच तन्मयतेने त्याने बाहेरून wax polish करायला घेतलं. मेकअप आर्टिस्ट जसा आमच्या चेहऱ्याची रूपरेषा पाहून डागडुजी करतो, उभारी आणतो तसंच काम ते कार वर करत होते. राहुल जे एरवी मॅनेजमेंट बघतात ते हातात पॉलिश, फडकी, ब्रश, एक बादली पाणी घेऊन उभे होते. एखादा रंगमंच सजतो आहे असं मला वाटत होतं.

पडद्यामागील रंगकर्मी कामात वाघ असतात. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर तोडगा असतो. त्यांना नवीन काहीतरी सुचत असतं आणि त्यांच्या विचारांमध्ये कल्पकता असते. आहे त्या संधीचं सोनं करायचं, प्रयोग गणित बसवायचं आणि कामाचा वेग वाढवायचा. वेळेत काम संपवायचं. वेळ पाळायची. आम्हा कलाकारांना हाती घेतलेल्या कामात स्वतःला झोकून द्यायची सवय असते. मग प्रेक्षकांच्या टाळ्यांमध्ये आमचा आनंद असतो. घेण्यापेक्षा देण्यात आम्ही सुख मानतो. गरजू, कष्टाळू, जिद्दी आणि तितकेच नम्र आणि सय्यमी बनायला आम्हाला आमची कर्मभूमी शिकवते. रंगभूमीची पूजा करून तिच्याशी प्रामाणिक राहणारे कलाकार पडेल तेंव्हा कंबर कसून काम करायला तयार असतात आणि कुठल्याही परिस्थितीत मान ताठ ठेवून चेहऱ्यावर स्मित ठेवून आत्मविश्वासाने सामोरे जायला आम्हाला आमची उदात्त रंगभूमीच शिकवते. माझे वडील म्हणतात, “राधिका तू एक कलाकार आहेस. पडेल ते काम करायला शिकायचं.” आई म्हणते, ” कोणालाही मदतीचा हात द्यावा लागला तर सर्वात आधी तुझा हात पुढे झाला पाहिजे.” सध्याच्या परिस्थितीत हे माझ्या कायम ध्यानात असतं.

माझ्या लाडो ला तयार करणाऱ्या कलाकारांबरोबर काढलेला हा फोटो एक उधरण आहे ह्या चौघांनी मांडलेलं. आणि माझ्या शुभेच्छा आहे प्रत्येक कलाकाराला जो नवीन करु पाहतो आहे. पुण्याच्या ह्या रंगकर्मींनी सर्वांसाठी उदाहरण ठेवलं आहे. मी त्यांची ७ वी प्रेक्षक (कस्टमर) आहे. आणि माझी लाडो आता नवऱ्या मुली सारखी सजली आहे. तिच्या आत शिरल्यावर नवीन नाट्य रंगेल. मी ड्रायव्हर सीटवर बसून सादर करेन, आणि नाटकाचं नाव असेल “नवराई नटली”.

माझी कन्या रास

सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात, आर्टिकल नंबर ३४. Uncut version इथे वाचा.

हे संवाद कुठल्याश्या मालिकेतले नाही किंवा सिनेमातले नाही. हे माय लेकीचे म्हणजेच माझे आणि माझ्या मुली अंतरा मधले संवाद आहेत.
अंतराला ती बारा वर्षांची झाली तेंव्हा आम्ही फोन घेऊन दिला. ती नको नको म्हणत असताना. एका हाकेच्या अंतरावर ती असावी. अडीनाडीला फोन कमी यावा. आम्हाला तिच्यावर लक्ष ठेवता यावं. या माहिती युगात तिला इंटरनेट वरून माहिती गोळा करता यावी आणि google maps वर रस्ता विसरलो तर तिला तो सांगता यावा म्हणून.
पण सध्या त्याचा उपयोग ऑनलाईन क्लासेस आणि माझ्याशी फावल्या वेळेत गप्पा मारता याव्या म्हणून. कारण मी सध्या माझ्या पुण्यातल्या घरा पासून लांब शूटिंग साठी मुंबईत आहे. आता तिचा फोन तिच्या सवयीचा भाग आहेच पण ती आता माझी जास्त गरज होऊन बसली आहे. पोरीशी दोन दिवस बोलणं नाही झालं तर जीव कासावीस होतो. गलबलायला होतं. जीव कासावीस होणं, गलबलायला होणं असं काही झालंच नसतं खरंतर, पण आईचा जन्म झाला की तिच्या काळजाचे दोन तुकडे होतात. एक तुकडा तिच्यात तर दुसरा तिच्या पिल्लात. मग मेंदूचं पण तसं होऊ शकतं. एक मेंदू स्वतः करता कार्यरत तर त्याचा दुसरा भाग तिच्या मुलांसाठी राखीव. माझं हे बोलणं तुम्हाला समजायला कठीण वाटू शकेल, जर तुम्ही एक आई नसाल तर. आणि सोप्पं जर तुम्ही आई होऊन पाहिलत तर.
माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी अजून लहान आहे. माझं आई म्हणून वय तेरा आहे आणि मी माझ्या किशोर अवस्थेतून प्रवास करते आहे. मी अजूनही शिकते आहे. मी फाजील, आगाऊ, थोडी शहाणी आणि थोडी वेडी आई तुम्हाला वाटू शकते कारण अहो माझं आई म्हणून वय फार झालेलं नाही आहे. आणि म्हणूनच, “अगं ए, फोन उचल ” चा माझा सूर खर्जा पासून तार सप्तकात जाऊ शकतो. कारण फोन उचलला नाही तर गॅरंटी कसलीच नाही.

अंतरा तिच्या किशोर अवस्थेतून यौवनात प्रवास करते आहे. त्यामुळे तिचा त्यामानाने उलटा प्रवास सुरू झाला आहे. तिच्यात स्त्री सुलभ भावना बळावत आहेत. ती अधिक समजुतदार होते आहे. आणि परिस्थितीशी जुळवाजुळव करणं तिला जमतं आहे. कसं? जेंव्हा ती माझा फोन उचलत नाही तेंव्हा मला कळतं.
“अंतरा माझा फोन का नाही उचलला?” ह्यावर तिची उत्तरं खालील प्रमाणे असतात.
आई, तू नाही आहेस ना म्हणून मीच आज स्वयंपाकघरात बाबांसाठी पालक पनीर आणि दाल मखनी बनवत होते.
आई तू नाही आहेस ना म्हणून मीच थोडा किराणा सामान सायकल वरून आणत होते आणि तूच म्हणतेस ना सायकल वर असताना कोणाचेही फोन घ्यायचे नाही.
आई ह्या वेळेला का फोन केलास तुला माहिती आहे नं माझे ऑनलाईन क्लासेस असतात, मी फोन उचलत नाही म्हणून.
आई अगं मी आजीशी गप्पा मारत बसले होते, तू पण सध्या तिला फोन करत नाहीस. तिलाही वाटतं कोणाशी तरी बोलावंसं म्हणून तुझा फोन घेतला नाही.
आई मी तुझ्या फोनची रात्री साडे अकरा पर्यंत वाट बघितली पण मग नंतर माझा डोळा लागला म्हणून फोन उचलला नाही.

अंतरा जेंव्हा अशी उत्तरं देते ना तेंव्हा कळतं की मुलगी मोठी होते आहे आणि आई म्हणून आपल्यालाही मोठं व्हायला हवं आहे. अंतरा कडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. तिला गप्पा मारायला खूप आवडतं. फोन वर तिचा आवाज खूप गोड येतो आणि ऐकता क्षणीच सगळा क्षीण नाहीसा होतो. काल पर्यंत माझ्याशिवाय पान न हलणाऱ्या मुलीचं विश्व आता बदलत चाललं आहे. तिने स्वतः कोऱ्या पानांच्या वही मध्ये रूप, रंग, गंध, स्पर्श आणि शब्द भरायला घेतले आहेत. त्याचा मला आनंदच आहे पण आई आहे ना मी. तिला हवी असलेली कोरी करकरीत वही आम्हीच आणून दिली तिला. स्वाक्षर, स्वतंत्र, स्वाभिमानी बनवण्याची घाई करून बसलो की काय असं माझ्या मन मोठं असलेल्या ‘छोट्याश्या आई ला’ प्रश्न करावासा वाटतो. हे कोडं अजून मला उलगडायचं बाकी आहे.
अंतरा ला मी परत विचारलं
मी: तुला कसं कळलं माझा मूड ठीक नाही आहे ते.
अंतरा: अगं मी तुझी मुलगी आहे, सांगितलं ना.
मी: फाजीलपणा करू नकोस.
अंतरा: मुलगी कोणाची आहे.
मी: आगाऊ कुठली.
अंतरा: आगाऊ असणं relative term आहे.
मी: अच्छा. आणि शहाणी म्हणाले तर?
अंतरा: “मोठी आली शहाणी”, की “शहाणं ग माझं बाळ ” ह्यावर ते अवलंबून असेल.
मी: माझ्या मूड बद्दल तुला कसं कळलं?
अंतरा: तुझ्या आवाजावरून. आणि तुला कसं कळलं की मला तुझी आत्ता आठवण येत होती ते?
मी: कारण मी तुझी आई आहे म्हणून. आणि मला तिसरा डोळा आहे.
अंतरा: आई सांग न!
मी: पुढच्या वेळेस एक दोन साडे माडे तीन म्हणायच्या आत फोन उचललास तर सांगेन.
अंतरा: आई…!

~रानी ( राधिका देशपांडे)

सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात आर्टिकल नंबर 33 – uncut version इथे वाचा. “मी मीटिंगमध्ये आहे”

“मी मीटिंगमध्ये आहे”

सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात आर्टिकल नंबर 33 – uncut version इथे वाचा.

मीटिंग मीटिंग मीटिंग. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेले की नवऱ्याच्या मीटिंग वर मीटिंग सुरू असतात. मार्च पासून जे वर्क फ्रॉम होम करता आहेत त्यांचं घर म्हणजे ऑफिस आणि घरातली एक खोली म्हणजे मीटिंग रूम. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा प्रसंग ओढवेल अशी कल्पनाच नव्हती. नवरा ऑफिस मध्ये उशिरा पर्यंत काम करत बसला असला की हमखास माझा एक टोमणा असायचा “काय घर वगैरे काही आहे का नाही?” सध्यातर तोही मारता येत नाही कारण नवरा घरातच असतो. त्याचं असणं छान वाटतं पण सारखं मीटिंग मध्ये असणं पचवता येत नाही.

त्याच्याशी जरा काही महत्त्वाचं बोलायला गेलो जसं की… “वरणाला फोडणी देऊ का साधं वरण च हवं आहे?” तर त्याचं उत्तर “मी मीटिंग मध्ये आहे!”.
हल्ली मी त्याला ईमेल करायला लागले आहे. “जेवणावरची मीटिंग बाकी आहे. कधी करणार आहोत?” मग ऑफिशीयल होकार आला की बरं असतं.
“माझं तुझ्यावर प्रेम आहे” आणि “मी मीटिंग मध्ये आहे” ह्यात फारसा फरक नाही आहे. कारण दोन्ही वाक्यांमध्ये आपल्याला हेच सांगायचं आहे की जरा थांब मी बोलतो तुझ्याशी पण आधी मला हे एक महत्त्वाचं काम संपवू दे.
खरं तर या वाक्याचा एवढाच अर्थ होत नाही. त्याचे अनेक अर्थ तुम्ही कोण, कुठे आणि काय करता आहात ह्यावर अवलंबून असतात.

म्हणजे बघा हे वाक्य कसंही वापरलेलं चालतं; कार मध्ये बसून, शॉपिंग करत असताना, पूजा करत असताना, जेवताना, शूट करत असताना, नाटक सिनेमा हॉल मध्ये, अगदी कधीही खपेल असं हे वाक्य आहे. समोरच्या माणसालाच कसंनुसं होऊन तोच सॉरी म्हणतो.
अनेकदा आपण कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी नसतो पण अत्यंत महत्त्वाच्या, लाडक्या, आवडत्या व्यक्ती बरोबर असतो. खूप जुनी मैत्रीण भेटते तेंव्हा, गुरुंकडे असतो तेंव्हा, बाळाशी खेळत असतो तेंव्हा, एखाद्या रंजक पुस्तकाचं शेवटचं पान वाचत असतो तेंव्हा. अनेकदा आपण हे वाक्य समोरच्या माणसाला टाळण्यासाठी, उगाच बोलायचा कंटाळा आला म्हणून, राग, इर्षा, अहंकार, चिडचिड, वैताग आला म्हणून वापरतो.
मी मीटिंग मध्ये आहे. हे वाक्य कितपत खरं आहे हे आपणही समोरच्या व्यक्तीने ते कसं घेतलं आहे यावर ठरवतो. मग आपल्याबद्दल अशीही वाक्य पलीकडचा माणूस बोलतो. “तो खरंच मीटिंग मध्ये असेल का?”. “काही मीटिंग वगैरे नाही. खोटं बोलतो आहे तो.” “सध्या त्याला वेळच नसतो, खूप मीटिंग सुरू असतात”. “भलत्या वेळेला काय मीटिंग ठेवतात?”
एकूण काय… ह्या वाक्यावर आपला पूर्ण विश्वास नसतो किंवा असला तरी त्याचे अर्थ बदलत जातात.

“मी मीटिंग मध्ये आहे” ह्याचा अर्थ कसा लावायचा, सकारात्मक का नकारात्मक, हे तीन जणांवर अवलंबून असतं. समोरचा माणूस, सद्य परिस्थिती आणि तुम्ही. मीटिंग म्हणजे भेट. भेट ह्या शब्दामध्ये सकारात्मकता आहे. सद्य परिस्थिती मध्ये माणूस माणसाशी भेटतो आहे, भेटून बोलतो आहे हे काय कमी आहे. अप्रत्यक्ष असो वा प्रत्यक्ष, पण भेटतो आहे आणि संबंध जोडतो आहे. काम वाढतं आहे. संवाद होतो आहे. ह्यातच सगळं आलं नाही?

आता माझं शूट सुरू झालं आहे आणि मी कामात व्यग्र झाले आहे. अनेकांना भेटते आहे. गप्पा रंगता आहेत. आणि अचानक कोणाचा कॉल आला तर मी ही सांगते आहे. “मी मीटिंग मध्ये आहे, जरा वेळाने फोन करू?” त्या क्षणी भेटलेली माणसं, झालेला संवाद, अनुभव, हे सगळे अनलॉक प्रक्रिये नंतर हवेहवेसे वाटत आहेत. समोरचा माणूस हे ऐकुन खुश होतो आहे की ही बिझी झाली आहे आणि तरीही माझा फोन दुर्लक्षित न करून हिने फोन उचलला आहे. मी जर कोणाला फोन लावला आणि समोरच्यानी सांगितलं “मी मीटिंग मध्ये आहे”, तर आनंदच होतो आहे कारण… तो सुखरूप आहे. तो परत कामात व्यग्र आहे. त्याचं व्यवस्थित सुरू आहे आणि त्याच्या अवतीभवती माणसं आहेत. तर हे चार शब्दांचं एक वाक्य सुखावणारं आहे, नाही का? मग त्याची मीटिंग संपली की आपण त्याला किंवा तो आपल्याला भेटेलच. आणि आपल्याला भेटल्यावर तोही तिसऱ्या कोणाला तरी म्हणेलच, “मी मीटिंग मध्ये आहे.”
चला माझी पण मी मीटिंग ठेवली आहे. वन ऑन वन की काय म्हणतात ना, ती. कोणाशी? गणपती बाप्पाशी. मीटिंगचा विषय मोठा आहे आणि बराच वेळ लागू शकतो. थोडक्यात काय तेवढ्यात तुमचा जर फोन आला तर तुम्हाला काय उत्तर मिळेल हे कळलंच असेल तुम्हाला? “मी मीटिंग मध्ये आहे!” भेटूच.

~रानी (राधिका देशपांडे)

‘सवारी’ सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३२. Uncut version इथे वाचा

सवारी

सकाळ वर्तमानपत्रात संपूर्ण महाराष्ट्रात. आर्टिकल नंबर ३२. Uncut version इथे वाचा.

“बोला ताई, कुठे जायचं आहे?” गोड, गोंडस, पिवळ्या काळ्या रंगाच्या या हत्तीच्या पिल्लातून तुम्ही कधी सवारी केली आहे का? अहो, म्हणजे ऑटो रिक्षा म्हणते आहे मी. मला वाटतं भारतात बहुतांश लोकांनी ह्यात प्रवास केला असणार आणि ऑटो मधला एक किस्सा तरी नक्कीच सांगण्यासारखा असणार. किती मिनिटात प्रवास केला ह्या पेक्षा तो कसा अविस्मरणीय होता यावर तो किस्सा असणार. कुठेही, कधीही, केंव्हाही पोचतो तो ऑटो आपण सगळ्यांनीच अनुभवला असणार. शाळेत जाण्यासाठी, कोणाला हॉस्पिटलला नेताना, प्रियकराला भेटण्यासाठी, भर पावसात, अज्ञात ठिकाणी आणि आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या सेवेत हजर, उभा असणारा हा ऑटो, नाही? आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की मी ऑटोत ड्रायव्हरच्या सीटवर बसून काय करते आहे? मी ऑटो चालवायला शिकते आहे. आता कशाला, कोणाचा, काय कारण असे प्रश्न तुम्हाला पडले असणार, मला माहितीये.

तर हा ऑटो आहे रमेश चांदणे, आमच्या “आई कुठे काय करते” मधल्या एका कलाकाराचा. त्याची आत्ता नुकतीच छोटीशी एन्ट्री झाली आहे. तो एक कलाकार असून ऑटो सुद्धा चालवतो. हा त्याचा स्वतःचा ऑटो आहे. मला ही बाब कौतुकाची आणि कुतूहलाची वाटली. मी त्याला विचारलं, “ऑटोच का?”तो म्हणाला, “हे बघ राधिका. ऑटो चालवायला वेळ, काळ, स्थळ लागत नाही. आपण कलाकार स्वच्छंदी, आपला अभिनयाचा व्यवसाय किती अस्थिर असतो हे तुला माहितीच आहे. मला फिरायला आवडतं. ही कल्पना मला माझ्या बायकोने दिली. ऑटो चालवायच्या माझ्या व्यवसायात वेळ, काळ, स्थळ यांचे बंधन नाही. शिवाय ते मूलभूत गरजांमध्ये मोडतं.” ते कसं तर त्यावर म्हणाला, “मग अन्न, वस्त्र, निवारा तसेच या बरोबर मनोरंजन आणि प्रवास ह्या सुद्धा पाठोपाठ माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यात मी माझा वाटा देतो आहे.” खरंय त्याचं म्हणणं. आम्हा कलाकारांना पडेल ते काम करण्याची सवय असते, कुठलीही लाज न बाळगता. आम्ही सुद्धा पोटार्थी माणसंच आहोत की! त्यात चांदणे सारखा हरहुन्नरी सारथी मिळाला तर प्रवास रंजक होत असेल हे निश्चित. त्यावर त्याचं म्हणणं होतं, “राधिका, अगं प्रवाशांचा अनुभव चांगला ठेवायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यांना त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोचवतो, माझी सर्व्हिस त्यांना प्रामाणिकपणे, आत्मीयतेने आणि आनंदाने देतो. माझे अनुभव चांगले आणि म्हणशील तर बरेच कठीण ही असतात. तू रिक्षा चालवत नाही, मी रोज चालवतो त्यामुळे ते तुला कसं कळणार. हे मला ठाऊक आहे.”

चांदणे बोलत होता ते खरं आहे. मला ऑटो चालवण्याचा अनुभव नाही, पण ट्रॅव्हल इंडस्ट्री मध्ये काम करण्याचा आहे. मी अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी दोन वर्ष बंगलोरला एअरपोर्टवर एअरलाइन मध्ये काम केलं आहे. काही प्रवासी आपल्याला माणूस म्हणून वागवतात तर काही आपल्याला जणू त्यांनी विकतच घेतलं आहे असा अविर्भाव आणतात. ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री यांचा जवळचा संबंध आहे. कारण इथे प्रत्येक जण प्रवासी आहे, आणि प्रवास हा प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी करतो. चांदणेनी सांगितलं की अनेक कलाकारांनी ऑटो, ट्रक चालवला आहे. त्यांच्यातलाच मी एक आहे असं तो म्हणतो. मग मी विचार केला मी पण तो चालवून बघायला काय हरकत आहे. तो म्हणाला, “रोज नवीन लोकांना भेटतो, रोज नवीन रस्ते धरतो. कृष्णाने रथ चालवला, मी ऑटो चालवतो. त्यानी अर्जुनाला उपदेश दिले, मी मात्र सवारी बसली की त्यांनी दिलेल्या अनुभवांनी श्रीमंत होतो. त्यातही मी मजा करतो बरं का! येणाऱ्या गिराहीकाच्या चालीवरून मी ओळखतो, हा प्रवासी कुठल्या प्रकारचा प्राणी आहे. वाघ, माकड, गेंडा का उंदीर. त्यावर मी त्याच्याशी वागायचं बोलायचं कसं हे ठरवतो. इथे माझे अभिनयाचे धडे उपयोगी पडतात तर कधी त्याचा कस लागतो.” तो म्हणाला ते खरं आहे. मी सुद्धा जेंव्हा एअरपोर्टवर काम करायचे तेंव्हा तर्‍हेतर्‍हेची माणसं भेटायची. माणूस ओळखायला, पारखायला, चाचपडायला मी शिकले. त्यांच्याशी बोलणं, त्यांना बोलतं करणं शिकले. त्यांच्या लकबी, हातवारे, हावभाव ह्याचं निरीक्षण करून सूक्ष्म हालचाली टिपून, घरी येऊन त्यांची नक्कल करणे, डोळ्यासमोर घडत असलेल्या प्रसंगांचे वर्णन करणे आणि त्यातलं नाट्य शोधणे हा खेळच होता माझ्याकरता.

आम्ही कलाकार स्वतःला सारथी समजतो. ड्रायव्हर सीटवर बसणं आम्हाला आवडतं. प्रवास करणं आणि तो इतरांना घडवून आणणं आम्हाला जमतं. प्रत्येक क्षणात आम्ही असतो. कर्ता-करविता तर खरा आमचा दिग्दर्शक असतो. आपण फक्त स्टिअरिंग धरण्याचं काम करतो, जे जोखमी चं असतच. पण गणरायाचा वरदहस्त असल्यावर आम्हाला कसली भीती! शूटिंग संपल्यावर चांदणे निघाला ऑटो घेऊन. मी सहज विचारलं, “आता घरी का?” तर म्हणाला, “नाही गं, एका आजोबांनी ऑटो बुक केला आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आणून द्यायची आहे. दोन दिवस आपलं शूट आहे. आजच बाप्पाला त्यांच्याकडे पोचवून देतो.” खरंच, कला आणि संस्कृतीची देवता गणपती यंदा आजोबांकडे ऑटोनी येते आहे. छान!

बरं तुमचं काय? येताय का माझ्याबरोबर? बसता आहे का माझ्या पाठीमागे ऑटोत? अहो मी ड्रायव्हर सीटवर बसली आहे. चांदणे कडून शिकून घेतलंय. गिअर खाली घेतले की स्पीड वाढते, वर घेतले की कमी होते. खरंच जमतंय मला, सांगा कुठे जायचंय तुम्हाला? ह्या ऑटोचं नाव मी गजगामिनी ठेवलंय. नेऊ का मी तुम्हाला उंच, काळ्या ढगांशी स्पर्धा करायला? का नेऊ तुम्हाला उसळत्या समुद्राच्या लाटांवरून हुलकावण्या देत, सातासमुद्रापार? बघाना, ड्रायव्हर सीटवर मी आहे. त्यामुळे फरारी च्या सवारी शिवाय कमी नसणारे! तोल गेला तर मला नाही हं म्हणायचं! कारण तुमचा तोल तुम्हीच सांभाळायचाय. ऑटो तीन चाकी आहे. तिचा तरी काय दोष. अहो त्यातच तर खरी मजा आहे! एकदा म्हणा “गणपती बाप्पा मोरया” आणि सुरू करा किक, स्टार्ट आणि भुर्र…

~रानी (राधिका देशपांडे)